Monday, April 3, 2017

राजकीय अगतिकता ?


       महाराष्ट्रातील  धनगरांसाठी राज्य सरकारची सकारात्मक भूमिका पाहून अनेक पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली  आहे. धनगर आरक्षणास पाठींबा देण्यावाचून  त्यांना काही पर्यायच उरला नाही. म्हणूनच की काय सध्या धनगर आरक्षणाचा प्रश्न  उचलण्याची जणू  चढाओढच लागली आहे. "आम्ही  धनगर आरक्षणाचा प्रश्न लावून  धरला म्हणून सरकारला काम करावे लागले" असे  भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न सगळे करताहेत. 

         आधी लोकसभेत सुप्रिया सुळे यांना धनगरांचा कळवळा आला. अतिशय भावुक होऊन  त्यांनी विषय मांडला. राज्यात त्यांच्या पक्षाची इतके वर्षे सत्ता असताना कुठे गेली होती भावुकता? सत्तेत असताना तर तुमच्या पक्षाच्या आदिवासी मंत्र्यांनी  - मधुकर पिचड  यांनी नकारात्मक रिपोर्ट  पाठवून धनगर समाजाची कोंडी करून ठेवली. त्यामुळेच TISS चे संशोधन करण्यावाचून काहीच पर्याय  राहिला नाही. 

       तुम्हाला जर  धनगरांवर  होणाऱ्या अन्यायाबद्दल एवढी आस्था होती  तर वारंवार  विनंती करूनही  एकदाही  तुमच्या पक्षाने धनगर आरक्षणाबाबत पक्षाची काय भूमिका आहे हे लेखी लिहून दिले नाही. असा दुटप्पीपणा का?

यानंतर धनगर समाजाची दिशाभूल करण्याचे काम मिडियाकडून करून घेण्यात आले. महाराष्ट्र,  छत्तीसगड,  मध्य प्रदेश च्या भाजप  खासदारांची बैठक झाली त्याबाबत अफवांचे पीक पेरण्यात आले. मा.  पंतप्रधान जे बोललेच नाही ते वाक्य  त्यांच्या तोंडी घालण्यात  आले. त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा कुटील डाव होता. मी स्वतः त्या बैठकीस पूर्ण वेळ उपस्थित होतो. धनगर आरक्षणाबाबत तेथे एक अक्षरही बोलण्यात आले नाही. धनगर आरक्षण हा विषय सुद्धा  तेथे निघाला नाही.  तरी मिडियामधे चुकीच्या खोट्या बातम्या पसरवून धनगर समाजास चिथवण्याचे काम सुरू झाले.

पाठोपाठ राज्य विधानसभेत धनंजय मुंडेंनाही चेव आला. एकाएकी 1.2 कोटी धनगर समाजाचे महत्त्वच वाढून गेले. 

हे सगळे कमी होते म्हणून की काय 'आप' च्या अंजली दमानिया यांनीही उडी मारून वाहत्या गंगेत हात धुवून  घेतले. एके काळी   धनगर आरक्षणास  पाठींबा  मागण्यास गेलो असता 'कुठल्याही आरक्षणाच्या मुद्द्यावर  आप  काम करणार नाही '  असे सांगणाऱ्या - आज मोदी फडणवीसांचे पुतळे जाळून धनगरांना भडकावण्याचे   काम करीत आहेत. 

माझ्या प्रिय समाजबांधवांनो ही सर्व  राजकीय  अगतिकता आहे हे लक्षात घ्या. बरेच जण म्हणतात की भाजप नेही फसवणूक  केली. मला मान्य आहे की उशीर होतोय पण योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे हे ही लक्षात  घ्यावे लागेल. सत्तेत  नसताना आरक्षणाची मागणी करणे सोपे असते पण सत्तेत राहून सकारात्मक पावले उचलण्याचे काम विद्यमान सरकार करीत आहे.  आपले काम होऊ नये यासाठी आधीच्या सरकारने अनेक अडथळे निर्माण करून ठेवले. त्यावर मात करण्यास वेळ हा लागेलच. 65 वर्षे सहन केले पण दोन  तीन वर्षे धीर आपण धरू शकत नाही असे का? धनगर आरक्षणाबाबत  एवढे सकारात्मक  असणाऱ्या  मुख्यमंत्र्यांच्या उद्देशावरच एवढ्या लवकर  संशय  घेणे योग्य नाही. 

जे घडलेच नाही त्यावर आपण एवढे रान माजवतो  पण ज्या सकारात्मक बाबी घडल्या त्याकडे मात्र लक्ष देत नाही. आजपर्यंत कधीच एकाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत छातीठोकपणे 'धनगरांना आरक्षण देऊ ' असे सांगितले नव्हते मात्र  मा. देवेंद्र फडणवीस पहिले असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी विधानसभेत हे सांगितले. 

नुकतीच 11 मार्च ला मी धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळास घेऊन त्यांच्यासोबत बैठक लावली. त्या बैठकीस TISS चे प्रमुख पदाधिकारी एवढेच नव्हे तर Tribal विभागाच्या प्रमुख सचिव मनिषा वर्मा उपस्थित होत्या. TISS  कडून होत असलेल्या दिरंगाई बद्दल  आम्ही नाराजी व्यक्त केली तेव्हा मा.   मुख्यमंत्र्यांनी  हा अहवाल लवकर देण्याच्या सूचना दिल्या. डिसेंबर अखेर नव्हे तर नोव्हेंबर मधेच सर्व्हे पूर्ण करून अहवाल देण्याचे ठरले. 

समाजबांधवांनो 65 वर्षातठप्प प्रथमच  एवढ्या सकारात्मक  गोष्टी घडताहेत. थोडा धीर  धरा. अफवांना बळी पडू 
नका. 

आपण एकजूट कायम ठेऊ. भडकवणा-या लोकांचा  कट हाणून पाडू. सरकार वर दबाव आणण्याचे काम एकजुटीने सुरू ठेऊ.
येळकोट येळकोट जय मल्हार 

🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑

         खासदार  डाॅ. विकास  महात्मे

🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑