भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे संविधान होय. अत्यंत जटील विविधता संपन्न देशाला एकासुत्रात गुंफण्याचे कठीण काम या संविधानाने साध्य केलेले आहे. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा अंतिम मसुदा संविधान सभेस सादर केला. म्हणून आपण २६ नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून दर वर्षी साजरा करतो. या निमित्ताने आपण आपल्या संविधानाचे महत्व समजून घेतले पाहिजे. याकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत दिलेले अंतिम भाषण आपल्यास मदत करते.
या भाषणात बाबासाहेबांनी संविधान निर्मितीत आलेल्या विविध अडचणीचा विस्ताराने परामर्श घेतला आहे. तसेच या कार्यात ज्यांनी विशेष योगदान दिले त्या सर्वांची दखल घेतली आहे. संविधानाच्या सर्व खुबींचाही सविस्तर उल्लेख केलेला आहे. पण त्याच बरोबर इतक्या कष्टाने संविधान तयार केल्यावरही देश समोर उभ्या राहू शकणाऱ्या संभाव्य अडचणींचाही त्यात परामर्श घेतलेला आहे. त्या संदर्भात ते म्हणतात, ’२६ जानेवारी १९५० ला भारत के लोकसत्ताक देश होईल तो या अर्थाने की, भारतात त्या दिवसापासून लोकांचे, लोकांनी बनविलेले आणि लोकांसाठी असलेले सरकार प्राप्त होईल. तोच विचार माझ्या मनात येतो, ह्या लोकसत्ताक संविधानाचे काय होणार? हा देश ते अबाधित ठेवण्यासाठी समर्थ राहील की पुन्हा तो ते गमावून बसेल.’ दुसरा धोका बाबासाहेब व्यक्त करतात, ‘ भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतात कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.’
या दोहोपेक्षा महत्वाचा इशारा बाबासाहेब देतात तो, ‘भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णत: अभाब आहे ही वस्तुस्थिती मान्य करूनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक समता आहे. सामाजिक क्षेत्रात आपला भारतीय समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निकृष्ट अवस्थेत असतात. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहींजवळ गडगंज संपत्ती आहे, तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. २६ जानेवारी १९५० ला आपण एक विसंगातीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे आपण नाकारीत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उध्वस्त करतील.”
बाबासाहेबांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणामच आज आपण भोगत आहोत. जातीधार्माधारित सामाजिक विषमतेमुळे आपण एकसंध राष्ट्र म्हणून उभे राहू शकलेलो नाही. तसेच आर्थिक विषमता दूर करू न शकल्याने गुन्हेगारी, आतंकवाद यांना पोषक वातावरण आपल्याकडे आहे. चला तर आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपण बाबासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करूया.